Dhamma Pada (Marathi)
₹ 30.00
Tags:
Product Details
भगवान बुद्धांच्या शिकवणुकीचे सार अर्थात प्रबुद्धतेकडे नेणारे सदाचारयुक्त, नीतिनिष्ठ आचरण व तदनुसार व्यक्तित्वाची जडण-घडण हा या पुस्तकाचा प्रतिपाद्य विषय आहे. मूळ ‘धम्मपद’ या ग्रंथातील सखोल आशय, सुबोधता तसेच वाङ्मयीन सौष्ठवामुळे हा धर्मग्रंथ सर्वमान्य झालेला असून अनेकानेक भाषांमधून त्याचा अनुवादही करण्यात आलेला आहे. हा लहान ग्रंथ केवळ बौद्धांपुरताच लोकप्रिय नाही तर, साधक, विद्वान-व्यासंगी जनांबरोबरच सर्वसामान्य लोकांमध्ये सुपरिचित व सुप्रसिद्ध आहे. प्रा. रं. रा. देशपांडे यांनी लिहिलेली ‘धम्मपद’ ही लेखमाला ‘जीवन-विकास’मधून पूर्वी मार्च-जुलै १९७४ या कालावधीत प्रकाशित करण्यात आली होती. कै. श्री. देशपांडे यांनी केलेला हा अनुवाद अतिशय भावगंभीर झाला असून उच्च जीवनाची स्पृहा असणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर तो खोल ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही. भगवान बुद्धांच्या सहृदयतेचा, त्यांच्या उत्तुंग आध्यात्मिक प्रतिभेचा प्रत्यय आपल्याला यातून मिळतो. श्री. देशपांडे यांच्या कन्या डॉ. सौ. अलका बाकरे, संस्कृत विभाग प्रमुख, मुंबई विद्यापीठ आणि त्यांचे चिरंजीव श्री. विनायक देशपांडे, मुंबई यांनी ही लेखमाला आमच्या मठाद्वारे ग्रंथ-रूपात प्रकाशित करण्यास सहर्ष मान्यता दिली. त्याबद्दल त्यांच्याप्रती आम्ही हार्दिक धन्यवाद व आभार व्यक्त करतो. धम्मपदातील विषय भगवान बुद्धांनी कोणत्याही प्रकारचा भेद न करता ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ व्यक्त केले आहेत म्हणून ते सर्वांच्या कल्याणासाठी मार्गदर्शक आहेत. शाश्वत शांती प्रस्थापित करणाऱ्या ह्या विचारांना बुद्धदेवांनी ठिकठिकाणी सनातन धम्म – शाश्वत ज्ञान म्हटले आहे. देश-काल-धर्म-जात-निरपेक्ष कोणत्याही खऱ्या सत्यान्वेषीला अध्यात्माच्या अधिराज्यात आरोहण करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.